Pimpri-Chinchwad-मोशीतील विषारी धुरावर महापौरांचा बडगा प्लास्टिक-टायर जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश
पिंपरी-चिंचवड :
मोशी परिसरात प्लास्टिक, टायर आणि भंगार जाळून होणाऱ्या वाढत्या वायू प्रदूषणाची महापौर रवि लांडगे यांनी गंभीर दखल घेतली आहे. विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेतील नागरिकांनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होत असलेल्या दुष्परिणामांविषयी महापौरांकडे निवेदन सादर केले. त्यानंतर महापौरांनी तातडीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
मोशी परिसरात वारंवार प्लास्टिक, टायर आणि इतर भंगार जाळल्याने परिसरात दाट धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना बसत असल्याचे महापौरांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. प्रदूषण करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, त्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाई केली जाईल.”
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच अनधिकृत भंगार साठे हटविणे, प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि कविता आल्हाट उपस्थित होत्या. महापौरांच्या हस्तक्षेपानंतर मोशीतील वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.