पॉक्‍सो गुन्‍ह्यातील आरोपी कर्नाटकातून जेरबंद खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई; दहा वर्षांपासून देता होता पोलिसांना गुंगारा

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उल्लेखनीय कारवाई करत तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या लैंगिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो) आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक केली आहे.
हनुमंत दुर्गाप्पा कुऱ्हाडे (वय ३४) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६ मध्ये निगडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या दहा वर्षांपासून तो ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, आरोपी कर्नाटक राज्यात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार रमेश मावसकर यांना आरोपीबाबत माहिती मिळाल्‍यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कानगुडे यांनी आरोपीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषणानंतर तो कुरागुंड, तालुका राणेबेन्नूर, जिल्हा हावेरी (कर्नाटक) येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्‍यानंतर पोलिसांचे पथक कर्नाटकला रवाना झाले. त्‍यांनी केलेल्‍या कारवाईत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्‍याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी आणि निलेश जाधव यांच्‍या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *