Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विद्यापीठाने सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी जंतर-मंतर परिसरातील आंदोलनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.
विद्यापीठाने जारी केलेल्या सूचनेनुसार, बेकायदेशीर आंदोलनात सहभागी झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवर तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधींवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
सूचनेत पुढे म्हटले आहे की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यास पोलिस गुन्हे दाखल होणे, विद्यापीठाकडून शिस्तभंगाची कारवाई, निलंबन किंवा हकालपट्टी यांसारखे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर जमाव किंवा आंदोलनापासून दूर राहावे.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली असून, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कायद्याचे पालन करून शैक्षणिक वातावरण अबाधित राखावे, असे आवाहन दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.