Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची सायबर फसवणूक केली. या प्रकरणी भोसरी, हिंजवडी, निगडी, देहूरोड, चाकण दक्षिण आणि तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवशी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
भोसरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चिंतामणी सिध्दप्पा पुजारी (रा. बालाजीनगर, टेल्को रोड, भोसरी) याने बनावट खाते उघडून ३ नागरिकांची १ लाख ८० हजार ३४६ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका महिला आरोपीने सायबर टोळीशी संगनमत करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा गैरवापर करत एनसीसीआरपी पोर्टलवरील ९ तक्रारींमधील ६ लाख ९७ हजार रुपये एटीएमद्वारे काढून घेतले. पोलीस शिपाई महेश दवंगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निगडी प्राधिकरणातील आयडीएफसी बँकेच्या खात्याचा वापर करून आदेश दत्तात्रय गिरी व त्याच्या साथीदारांनी कर्नाटकातील एका तक्रारदाराचे २ लाख २० हजार रुपये चेकद्वारे काढून घेतले. पोलीस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. देहूगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत स्वतःचे खाते सायबर फसवणुकीच्या व्यवहारासाठी वापरू देणाऱ्या ओंकार राजेंद्र मोरे (वय २१, रा. माळवाडी, देहूगाव) या तरुणावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, महिला पोलीस शिपाई अश्विनी पसपुल (वय ३३) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीने तब्बल १३ लाख ४० हजार १ रुपयांचे अवैध व्यवहार केले आहेत.
चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात आरोपींनी आयडीएफसी फर्स्ट बँकेतून सायबर फसवणुकीची १३ लाख ८० हजार रुपयांची रक्कम चेकद्वारे, तर मेदनकरवाडी व नाणेकरवाडी परिसरातील एटीएममधून १० लाख ६० हजार रुपये रोख स्वरूपात काढून शासनाची व तक्रारदारांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस शिपाई महादेव बिक्कड व विशाल बंड (रा. चाकण दक्षिण पोलीस ठाणे) यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. तळेगाव दाभाडे येथे किरण राजेंद्र शिंदे (वय ३६, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) याने सलून व स्वतःच्या नावे बँक खाती उघडून देशातील ७ नागरिकांची ६ लाख १० हजार १६५ रुपयांची फसवणूक केली. पोलीस शिपाई इंद्रभान इंगळे (वय ३०) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरटे सर्वसामान्यांना व तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतात किंवा गैरवापर करतात. फसवणुकीची रक्कम त्याद्वारे काढून घेतात. या सर्व फसवणूक प्रकरणी भोसरी, हिंजवडी, निगडी, देहूरोड, चाकण दक्षिण आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सविस्तर तपास करीत आहेत.