पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच दारू पीत बसलेल्या चार जणांनी पोलिसांचा खबरी म्हणत कपडे काढून मारहाण केली. ही घटना गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी घडली.
विजय आदिकराव साठे (५१, जुनी सांगवी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश बर्डे, अमित चलवादी, राहुल चव्हाण, अक्षय मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साठे हे गुरुवारी सायंकाळी जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसले होते. तिथेच आरोपी दारू पीत बसले होते. साठे यांना पाहून आरोपी म्हणाले, तू खबरी आहेस. तू पोलिसांना आमची खबर देतो.’ त्यावरून साठे यांचे कपडे काढून त्यांना रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये साठे यांच्या हाताला फ्रॅक्चर आले असून डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.