पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना यश मिळाले आहे. बिहार, मुंबई आणि बंगळुरूपर्यंत पाठलाग करत पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले तब्बल १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील भाजी विक्रेती कविता मदन कड या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुकान बंद करून यात्रेसाठी मूळगावी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार संतोष काळे आणि शुभम खंडागळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मुख्य सूत्रधार निक्कुकुमार देवकी सिंग हा चोरीचे सर्व सोने घेऊन बिहारला पसार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हार न मानता सलग चार महिने बिहार, मुंबई आणि बंगळुरू येथे शोधमोहीम राबवली.
या कारवाईत रंजनकुमार देवकी सिंग याला मुंबईतून, तर निक्कुकुमार देवकी सिंग याला बंगळुरूतून अटक केली. चौकशीत चोरीचे दागिने बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.
या प्रकरणात निक्कुकुमार देवकी सिंग (२२), रंजनकुमार देवकी सिंग (२०), राजकुमार ऊर्फ प्रिन्सकुमार विजय पासवान (१९) आणि डिंपल पटेल विनोद सिंग (२६, सर्व रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड व बसवराज तेली, उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक कल्याण घाडगे तसेच गुन्हे शोध पथकाने केली.