महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर राष्ट्रीय कार्यशाळा सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, संवेदनशील तपास आणि डिजिटल फॉरेन्सिकवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
पिंपरी : महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान, प्रभावी आणि तंत्रशुद्ध करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्य पोलिस दल आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ जुलै) डी. वाय. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, डिजिटल फॉरेन्सिक आणि लिंगसंवेदनशील पोलिसिंग या विषयांवर देशातील तज्ज्ञांनी पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. माजी प्रधान न्यायाधीश स्वाती चौहान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या अपर पोलिस महासंचालक अश्वती दोर्जे, विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, शारदा राऊत, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, संजय दराडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल तसेच राष्ट्रीय महिला आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह उपस्थित होते.
विजया रहाटकर म्हणाल्या, ‘‘महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेशी संवेदनशीलतेने आणि सन्मानाने वागून तिच्या तक्रारीवर तातडीने योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.’’
स्वाती चौहान यांनी महिला, पुरुष आणि तृतीयपंथीय व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये समान दृष्टीकोन ठेवून तपास करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ब्रिजेश सिंह यांनी महिलांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, त्यातील धोके तसेच सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून तपास अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजीही त्यांनी स्पष्ट केली.
संजय तुंगार आणि सागर पानमंद यांनी आधुनिक तपास पद्धती, डिजिटल फॉरेन्सिक आणि तंत्रज्ञानाधारित तपासाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. डॉ. उमा सुब्रमण्यम यांनी पीडित व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून संवेदनशील आणि परिणामकारक तपास कसा करावा, याविषयी विवेचन केले.
महिला सुरक्षेला तंत्रज्ञानाची जोड
महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पुरावे, सायबर तपास आणि लिंगसंवेदनशील दृष्टिकोन यांचा प्रभावी वापर केल्यास तपासाची गुणवत्ता वाढून आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास कार्यशाळेतील मान्यवरांनी व्यक्त केला.