पुण्यातील गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री एका केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज झाल्याची घटना घडली. आइमाता मंदिराजवळील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गॅस लिकेजमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बी.ए. सेट परिधान करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. या घटनेत एकूण 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. त्यापैकी 14 नागरिकांना शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 द्वारे तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि एक जवान यांनाही त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि सुमारे 30 जवानांनी हे बचावकार्य यशस्वीरीत्या पार पाडले. दलाकडील बी.ए. सेट वाहनासह चार अग्निशमन वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली होती. तत्परतेने केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील गंगाधम चौकात मध्यरात्री केमिकल कंपनी मधून मोठया प्रमाणात गॅस लिक…चोवीस जणांना श्वास घेण्यास त्रास…
