पाटण तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “पाटणसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, ही शासनाची प्राथमिकता आहे. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी, जमीन अधिग्रहण आणि प्रशासकीय बाबींमध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा.”
बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई रवीद्रन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच सातारा, पाटण येथील आरोग्य विभागाचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
