पुणे :
राज्यातील प्रवासी वाहतूक चालकांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ या मंडळाचे नाव बदलून ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे करण्यात आले आहे. या मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असून, सर्व पात्र चालकांनी तातडीने सभासदत्व घ्यावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी तसेच प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांना या मंडळाच्या माध्यमातून ६५ वर्षांनंतर सन्मान निधी, कर्तव्यावर असताना जीवन व अपंगत्व विमा, आरोग्य सुविधा, कौशल्यवृद्धी प्रशिक्षण, अपघातात दुखापत झाल्यास आर्थिक मदत तसेच चालकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती अशा विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.
सभासद होण्यासाठी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी व ओळखपत्र शुल्क ५०० रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये, असे एकूण ८०० रुपये भरावे लागणार आहेत.
पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी सर्व पात्र प्रवासी वाहतूक चालकांनी मंडळाचे सभासदत्व घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. परिवहन क्षेत्रातील चालकांचे सामाजिक आणि आर्थिक संरक्षण मजबूत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रवासी वाहतूक चालकांसाठी दिलासादायक निर्णय; ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब’ कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्याचे आवाहन विमा, सन्मान निधी, शिष्यवृत्ती आणि आरोग्य लाभांचा मिळणार फायदा; ऑटो-रिक्षा, टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन
