एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनचालकांवर कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला आठ लाख ४४ हजारांचा दंड
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कठोर कारवाई सुरू केली आहे. जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत २७ दिवसांत तब्बल ८४४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८ लाख ४४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
वाहनांची ओळख निश्चित करणे, बनावट नंबर प्लेटचा वापर रोखणे आणि गुन्हे उघडकीस आणण्यास मदत व्हावी, यासाठी एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. तरीही अनेक वाहनचालक या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत शहरभर विशेष तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि नाकाबंदीच्या ठिकाणी २ हजार ५३२ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या ८४४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून ८ लाख ४४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी १ लाख ७७ हजार रुपयांचा दंड तात्काळ वसूल करण्यात आला असून, उर्वरित दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मते, एचएसआरपी नंबर प्लेट ही केवळ कायदेशीर अट नसून वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. या प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविणे सुलभ होते. तसेच चोरी, गुन्हे आणि बनावट नंबर प्लेटचा वापर रोखण्यास मदत होते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनचालकांना कारवाईची वाट न पाहता तातडीने आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध येत्या काळात आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनचालकांनी तातडीने नियमांचे पालन करावे, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.]