पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते अरुप बिस्वास यांनी बँकेला पत्र लिहून तृणमूल काँग्रेसचे बँक खाते गोठवण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षाच्या आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शकता आणि अधिकृत प्रक्रियेचे पालन होत नसल्याचा आरोप करत ही मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडीमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
अरुप बिस्वास यांच्या पत्रानंतर पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वावरील प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणावरून ममता बॅनर्जी सरकार आणि तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून या प्रकरणावर अधिकृत भूमिका मांडली जाण्याची शक्यता असून, खाते गोठवण्याच्या मागणीवर बँक प्रशासन काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
