मुंबई(mumbai) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. सहा खासदारांनंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही महायुतीच्या पाठिंब्याने विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. विशेषतः वरळी मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यात आणि आदित्य ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील संख्याबळावर परिणाम झाला आहे.
अहिरांच्या जाण्यानंतर विधान परिषदेत ठाकरे गटाकडे आता केवळ पाच आमदार उरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विधान परिषदेतील पक्षाची ताकद आणखी कमी झाल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
