एफडीएची पुणे आणि सोलापूर विभागात धडक कारवाई १३ लाख ७१ हजार रुपयांचा भेसळयुक्त आणि अस्वच्छ अन्नसाठा जप्त दूध प्रक्रिया उद्योग, दुग्धशाळा आणि हॉटेल्सवर छापे परवाने निलंबित हजारो लिटर दूध व मिठाई नष्ट

पुणे :
राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली. २५ ते २७ जून या कालावधीत करण्यात आलेल्या या मोहिमेत १३ लाख ७१ हजार रुपयांचा संशयित भेसळयुक्त आणि अस्वच्छ वातावरणात तयार केलेला अन्नसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक दूध प्रक्रिया केंद्रे, दुग्धशाळा आणि हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध दूध प्रक्रिया उद्योग, दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे प्रकल्प, मिठाई उत्पादक आणि हॉटेल्सची तपासणी केली. या तपासणीत अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधात भेसळीचा संशय आल्याने १२ हजार २७८ लिटर दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. संबंधित संस्थेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. आंबेगाव तालुक्यातील उमिया मिल्क प्रॉडक्ट येथे अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथून एक हजार १५५ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून संबंधित परवानाही रद्द करण्यात आला. ताथवडे येथील गुड फूड रोल हाऊस अँड तंदुरी हाऊसमध्ये अन्न सुरक्षेच्या गंभीर त्रुटी आढळल्याने त्या आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरीमध्ये कोणताही वैध परवाना नसताना आणि अत्यंत अस्वच्छ ठिकाणी मिठाईचे उत्पादन सुरू असल्याचे तपासात उघड झाले. प्रशासनाने तेथील एक हजार ८०७ किलो मिठाई जप्त करून नष्ट केली. माळशिरस येथील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूधही नष्ट करण्यात आले असून संबंधित परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे. नागरिकांनी दूध, मिठाई आणि इतर अन्नपदार्थ खरेदी करताना एफएसएसएआय परवाना क्रमांक, उत्पादनाची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख आणि पॅकिंगवरील माहिती तपासूनच खरेदी करावी. तसेच भेसळयुक्त किंवा अस्वच्छ अन्नपदार्थ तयार होत असल्याची माहिती मिळाल्यास प्रशासनाकडे तातडीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *