पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातील नानेकरवाडी येथे धाड टाकून गांजा मिश्रित ‘बंटा’ नावाच्या गोळ्या आणि प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण दोन लाख ४१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राहुलसिंग हेमराजसिंग लोदी (वय २५, रा. नानेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस उपनिरीक्षक जिलाणी मोमीन यांना गोपनीय माहिती मिळाली की, नानेकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत राहुल लोदी याने विक्रीसाठी गांजा मिश्रित ‘बंटा’ गोळ्या आणल्या आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संदीप नानेकर यांच्या मालकीच्या खोलीवर छापा टाकला. या कारवाईत १४९ किलो ७१५ ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित बंटा गोळ्या (किंमत ६४ हजार ८०० रुपये), महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला १ लाख ६६ हजार ,९७० रुपये किमतीचा गुटखा आणि एक मोबाइल फोन असा एकूण दोन लाख ४१ हजार ७७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक जिलाणी मोमीन आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस स्टेशन करीत आहे.
चाकणमधून १४९ किलो ‘बंटा’ गोळ्यांसह गुटखा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथकाचा मोठा छापा
