२१ गोळ्यांचा मारा, कोयत्यानेही वार; तीन महिन्यांपूर्वीच दिली होती जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – आई आणि भावाच्या जामिनाला विरोध केल्याच्या रागातून देहूरोड परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. रमेश गुरुस्वामी रेड्डी (वय अंदाजे ४०, रा. देहूरोड) याच्यावर आरोपींनी गोळीबार करत कोयत्याने वार केले. मंगळवारी रात्री ही थरारक घटना घडली.
आरोपी लखन आगळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी शारदा रेड्डी (वय ३९, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी रमेश रेड्डी यांच्या भावाचा खून झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींच्या जामिनाला रमेश विरोध करत होता. याच कारणावरून त्याला तीन महिन्यांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
मंगळवारी रात्री रेड्डी हे मित्रासह कपडे घेण्यासाठी गेले होते. दुकानाबाहेर येताच आरोपी कार आणि दुचाकीवर आले. त्यांच्या हातात पिस्तूल आणि कोयते होते. आरोपींनी शिवीगाळ करत रेड्डीकडे धाव घेतली. भीतीने परिसरातील लोक पळू लागले.
रमेश पळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. तब्बल २१ गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील नऊ गोळ्या शरीरात घुसल्या. एका आरोपीने डोक्यात कोयत्याने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेनंतर वायसीएम रुग्णालयात तणाव निर्माण झाला. नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या खुनामागील सर्व आरोपींचा शोध सुरू आहे. देहूरोड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जामिनाला विरोधाचा ‘रक्तरंजित’ शेवट! देहूरोडमध्ये गोळीबारात रेड्डीचा खून
