अकरा वीजजोडण्यांसाठी दोन लाखांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात वीजमीटर मंजुरीच्या नावाखाली पैशांची मागणी; देहूगावात लाच स्वीकारताना रंगेहात कारवाई

पिंपरी–चिंचवड :
सामान्य नागरिकांना वीजजोडणी मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणेतील काही कर्मचारी अजूनही लाचेचा मार्ग अवलंबत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. येलवडी येथील ११ प्लॉटधारकांच्या नवीन वीजमीटर जोडण्यांची कामे करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. देहूगावातील भैरवनाथ चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, रा. विठ्ठलवाडी, देहू, मूळगाव हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत असून येलवडी येथे नियुक्त आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासनमान्य इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. येलवडी येथील एका प्लॉटिंगमधील महिलेने नवीन वीजमीटर बसविण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. त्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला होता.

अर्जानंतर जागेची पाहणी करण्यासाठी तक्रारदारांनी वायरमन गजानन चट्टे याची भेट घेतली. त्यावेळी चट्टे याने संबंधित प्लॉटिंगमधील सर्व ११ प्लॉटसाठी वीजमीटर मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
५ जून रोजी एसीबीने मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. देहूगावातील भैरवनाथ चौक परिसरात चट्टे याने तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.
सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने नागरिकांकडून लाच मागितल्याच्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, महावितरणच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *