₹१.२५ लाखांच्या लाचेचा सौदा; उर्वरित ₹२५ हजार स्वीकारताना संतोष राणे रंगेहात अटकेत
महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड; पुणे ACBची मुळशीत धडाकेबाज कारवाई
हिंजवडी :
वडिलोपार्जित जमिनीवरील फेरफार नोंदीसाठी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांची लाच मागून त्यातील एक लाख रुपये आधीच स्वीकारलेल्या मुळशी तालुक्यातील माण सजाचे तलाठी संतोष प्रल्हाद राणे याला उर्वरित २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर तक्रारदार व त्यांच्या भावाचे नाव नोंदविण्याचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी वर्ग-३ चे लोकसेवक असलेला तलाठी संतोष प्रल्हाद राणे (वय ४५, रा. गंगा ओशियन पार्क, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांनी तब्बल ₹१ लाख २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी तलाठ्याने यापूर्वीच तक्रारदाराकडून ₹१ लाख स्वीकारून फेरफार नोंद पूर्ण केली होती. मात्र उर्वरित ₹२५ हजार रुपयांसाठी सातत्याने तगादा लावला जात होता. अखेर त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ११ मे २०२६ रोजी पुणे ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर ACB पथकाने १४ मे रोजी पडताळणी केली असता तलाठी राणे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच यापूर्वी ₹१ लाख स्वीकारल्याची बाबही पडताळणीत स्पष्ट झाली.
यानंतर ACBने मंगळवारी सायंकाळी माण येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी तक्रारदाराकडून ₹२५ हजारांची रक्कम स्वीकारताना संतोष राणे यांना पथकाने रंगेहात पकडले. कारवाईनंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या कारवाईस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे करत आहेत.
“लाच मागितल्यास तक्रार करा” : ACBचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACBने केले आहे.
