लंडन : मुलांचे मानसिक आरोग्य, ऑनलाइन सुरक्षितता आणि वाढत्या डिजिटल व्यसनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील १६ वर्षांखालील सर्व मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी केली. या निर्णयामुळे जगभरात चर्चा सुरू झाली असून बालसुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
“आज आपल्या देशासाठी मोठा क्षण आहे. हे मोठे पाऊल आहे. मुलांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी हा खरा बदल आहे. देशात सरकार १६ वर्षांखालील सर्व मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणार आहे,” असे स्टार्मर यांनी जाहीर केले. “मी हा निर्णय केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक वडील म्हणून घेत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता, सायबर बुलिंग, ऑनलाइन शोषण आणि मानसिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटन सरकारने कठोर भूमिका घेत ही घोषणा केली आहे.
सरकारच्या प्रस्तावित धोरणानुसार फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना वापरकर्त्यांचे वय काटेकोरपणे पडताळावे लागणार आहे. १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया खाते उघडण्यापासून रोखण्यासाठी विशेष तांत्रिक यंत्रणा विकसित केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाणार आहे.
या निर्णयाचे बालहक्क संघटना, मानसोपचारतज्ज्ञ आणि पालक संघटनांनी स्वागत केले आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि इतर अनेक देशांमध्येही अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत कठोर नियम लागू करण्याची चर्चा सुरू असून ब्रिटनचा हा निर्णय जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जात आहे. डिजिटल युगात मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे हे पाऊल भविष्यात इतर देशांसाठीही आदर्श ठरू शकते, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
