नवी दिल्ली(delhi) : २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ (Re-NEET) फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) कडक नियमावली जाहीर केली आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने उमेदवारांच्या पोशाखासह परीक्षा केंद्रांवरील अनेक नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार परीक्षा केंद्रात बुरखा, मास्क, दुपट्टा, स्कार्फ, कॅप, टोपी तसेच चेहरा झाकणारे कोणतेही वस्त्र परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. ओळख पडताळणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये आणि गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ डिव्हाइस, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, कॅल्क्युलेटर आणि इतर प्रतिबंधित वस्तू नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी ठरलेल्या वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक पडताळणी, कडक सुरक्षा तपासणी आणि सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था करण्यात आली असून प्रश्नपत्रिका गळतीसारखे प्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या नियमावलीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चर्चेला उधाण आले असून परीक्षेच्या दिवशी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
