लाडकी बहीण योजनेवर CAGचे गंभीर ताशेरे; ३,५४१ कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत अंदाजपत्रक नियोजन आणि खर्च नियंत्रणामध्ये मोठ्या त्रुटी राहिल्याचे CAGच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा ३,५४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात आला. या अतिरिक्त खर्चासाठी पुरेसा आर्थिक आधार किंवा नियोजन नसल्याचे निरीक्षण CAGने नोंदवले आहे.

या अतिरिक्त आर्थिक भारामुळे रस्ते, शाळा, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत विकास प्रकल्पांसाठी राखीव निधीवर परिणाम झाल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामांच्या निधीवर ताण आल्याची नोंद CAGने केली आहे.

CAGच्या या निरीक्षणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, विरोधकांनी सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तर सरकारकडून या अहवालावर अधिकृत भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *