भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भरधाव टेम्पोने दाम्पत्याला चिरडले
अपघातात महिलेचा जागीच अंत, जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू; संतप्त जमावाने चालकाला चोपले
तळेगाव – तळेगाव-चाकण रस्त्यावर सोमवारी रात्री मृत्यूने भीषण घाला घातला. एका भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (दि. ४) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास भंडारा डोंगराच्या पायथ्याशी हा अपघात घडला.
टेम्पो अंगावरून गेल्याने भीषणता वाढली
उषा तानाजी बधाले (वय ४५, रा. बधालेवाडी) असे मृताचे नाव आहे. तानाजी बधाले हे गंभीर जखमी आहेत. बधाले दाम्पत्य दुचाकीवरून वडगाव येथून आपल्या घराकडे निघाले होते. भंडारा लॉन्ससमोर आले असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर भरधाव टेम्पो थेट त्यांच्या अंगावरून गेला.
नागरिकांचा संताप अनावर
अपघाताचे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच उषा बधाले यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तानाजी बधाले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते.
चालकाला चोपून काढले
अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेम्पो चालकाला नागरिकांनी पकडले. संतप्त जमावाने चालक सलीम खलिद अहमद (वय ३५) याला खाली उतरवून बेदम चोप दिला. यामध्ये चालकही जखमी झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
