पिंपरी-चिंचवड :
देहूरोड येथील व्यापारी खून प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्रधारकांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ९ देशी बनावटीची पिस्तूलं (कट्टे), ५ जास्तीचे मॅक्झिन आणि ४६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एकूण ८ लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल असून शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्तांचे कडक आदेश
देहूरोड येथे नुकतीच गोळीबाराची गंभीर घटना घडली होती. या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तैनात करण्यात आली होती.
खबऱ्याच्या माहितीने फुटले गुपित
शहरात गस्त घालत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना अवैध शस्त्रांबाबत ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सापळा रचून थेरगाव आणि पाषाण परिसरातून चार सराईतांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
अहारुद्दीन रफिक सुतार (वय ३०, रा. थेरगाव)
वैभव अशोक शेटे (वय ३१, रा. थेरगाव)
सौरभ धनंजय जाधव (वय २७, रा. पाषाण)
अक्षय अशोक कांबळे (वय ३१, रा. पाषाण)
मुद्देमाल जप्त आणि पुढील तपास
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. यामध्ये नऊ कट्टे, ४६ काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण ८ लाख रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला. हे आरोपी एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे कोठून आणली आणि त्याचा वापर कोठे करणार होते, याचा तपास आता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही उल्लेखनीय कामगिरी आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सपोनि दत्तात्रय गुळीग, पीएसआय शिवानंद स्वामी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली.
