Delhi-धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची प्रतिक्रिया; “मला हिरो बनवू नका, देशाला व्यक्तिपूजेची सवय घातक”
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजित दीपके यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत व्यक्तिपूजेवर टीका केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय एकट्या व्यक्तीला न देता, हा संघर्ष विद्यार्थ्यांच्या सामूहिक लढ्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मला हिरो बनवू नका. एकाच माणसाला हिरो बनविण्याच्या सवयीमुळेच देशाचं वाटोळं झालं आहे. जेव्हा तुम्ही एका माणसाला मूळ मुद्द्यांपेक्षा, संस्थांपेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं बनवता, तेव्हा तो माणूस देशाचं वाटोळंच करणार.”
त्यांनी आंदोलनाला मिळालेल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला, लोकशाही मार्गाने उभारलेल्या संघर्षाला आणि देशभरातून मिळालेल्या जनसमर्थनाला दिले. व्यक्तीपेक्षा संविधान, संस्था आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असताना अभिजित दीपके यांच्या या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.