महाड, दि. १२ (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. काही शहरांमध्ये तापमान ४२ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. या असह्य उष्णतेचा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसू लागला आहे. दुपारच्या वेळी राज्यातील गड-किल्ले, डोंगरमाथे आणि उंचावरील देवस्थानांमध्ये अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे पर्यटकांनी फिरण्याकडे पाठ फिरवली आहे.
रायगड किल्ला, प्रतापगड, सिंहगड, तोरणा किल्ला आणि विविध डोंगररांगांमधील देवस्थानांवर पर्यटकांची संख्या घटली आहे. उन्हाळी सुट्टी सुरू असूनही अपेक्षित गर्दी दिसत नाही. सकाळी काही पर्यटक येत असले तरी दुपारच्या वेळी गड परिसर पूर्णपणे ओस पडत आहे.
मार्चपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली होती. मे महिन्यात तर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे पर्यटकांनी लांबचा प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी थंड हवेच्या पर्यटनस्थळांकडे मोर्चा वळवला आहे.
रायगड परिसरातील रोपवे सेवा, खासगी वाहतूक आणि स्थानिक जीप व्यवसायालाही याचा फटका बसला आहे. पूर्वी दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ असायची. आता ती संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात हालचाल दिसते. मात्र दुपारी गडांवर शांतता पसरलेली असते.
उष्णतेसोबतच पाणीटंचाईचे संकटही गंभीर बनले आहे. अनेक गडांच्या पायथ्याशी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कुटुंबासह फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
पर्यटनावर अवलंबून असलेले स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गाईड, हॉटेल चालक, ताक-दही विक्रेते, खानावळी आणि स्मृतिचिन्ह विक्रेत्यांचे उत्पन्न घटले आहे. सुट्टीच्या हंगामातून व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र वाढत्या तापमानामुळे ती फोल ठरत आहे.
“उन्हामुळे दुपारच्या वेळी कोणीही बाहेर पडत नाही. पर्यटक कमी झाल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकाने दिली.
हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गड-किल्ले आणि डोंगर पर्यटनाला आणखी फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रणरणत्या उन्हाने गड-किल्ले ओस पडले दुपारच्या कडक तापमानाचा पर्यटनाला फटका; डोंगरावरील देवस्थानांतही घटली गर्दी
