नवी दिल्ली:
वातानुकूलित (AC) डब्यातून हजारो रुपयांचे तिकीट काढून प्रवास करायचा आणि उतरताना रेल्वेचे टॉवेल, चादरी गुपचूप पिशवीत कोंबायच्या… श्रीमंत प्रवाशांच्या या ‘चिंधीगिरी’चे एक अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणे वास्तव समोर आले आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळवलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत देशातील रेल्वे डब्यांमधून तब्बल १ कोटी २७ लाख बेडशीट्स, टॉवेल्स, उशांची कव्हर्स आणि ब्लँकेट्स प्रवाशांनी चोरून नेली आहेत.
सर्वसामान्यांना वाटते की या चोरीमुळे सरकारी रेल्वेचे नुकसान होत आहे, पण या चोरीचा खरा आणि थेट फटका रेल्वेत ₹७०० रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब मुलांच्या पोटाला बसत आहे.
तुमची एक चोरी आणि गरिबाच्या पगारात कपात!
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना बेडरोल पुरवणे, ते धुणे आणि त्यांची व्यवस्था राखणे ही जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर (Contractors) असते. प्रवाशांनी चोरून नेलेल्या प्रत्येक टॉवेल किंवा बेडशीट्सची पूर्ण किंमत रेल्वे प्रशासन या कंत्राटदारांकडून वसूल करते. कंत्राटदार ही रक्कम स्वतः सोसत नाहीत, तर ती रेल्वे गाड्यांमध्ये रात्रंदिवस बेड अंथरणारे आणि गोळा करणाऱ्या गरीब कामगारांच्या पगारातून कापून घेतली जाते.
हे तरुण अवघ्या ₹७०० च्या रोजंदारीवर काम करतात. प्रवाशांच्या एका चोरीमुळे या मुलांच्या हक्काच्या पगारातून रोज ₹१०० ते ₹१५० कापले जातात. प्रवाशांच्या या वाढत्या चोऱ्यांमुळे अनेक कंत्राटदारांनी वैतागून रेल्वेची कंत्राटं सोडल्याचेही समोर आले आहे.
चार वर्षांतील चोरीचा लेखाजोखा:
RTI अंतर्गत ५४ रेल्वे डिव्हिजन्सनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कोविडनंतर लिनन सेवा पुन्हा सुरू झाल्यापासून या चोऱ्यांमध्ये ५६% वाढ झाली आहे. प्रवाशांनी लांबवलेल्या साहित्याची एकूण किंमत १०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे:
टॉवेल्स (रुमाल): ४७ लाख (सर्वात जास्त चोरी)
बेडशीट्स (चादरी): ४१ लाख
उशीचे कव्हर्स: २४ लाख
ब्लँकेट्स (कांबळी): १३ लाख
चोरीत ‘ही’ शहरे आघाडीवर
या लिनन चोरीच्या प्रकरणांमध्ये राजस्थानमधील बिकानेर हे शहर देशभरात सर्वात पुढे आहे. त्याखालोखाल बिहारमधील रांची, तसेच दिल्ली, मुंबई, जोधपूर आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमधून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये या चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे. याउलट, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अशा चोऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे.
’NEWS-BEEZ’चा रोखठोक विचार:
खिशात हजारो रुपये आणि बँक बॅलन्स असूनही सरकारी मालमत्ता चोरण्यात धन्यता मानणाऱ्या प्रवाशांची ही कृती त्यांची आर्थिक सुबत्ता नव्हे, तर मानसिक दरिद्रीता दर्शवते. रेल्वेतून उतरताना रेल्वेचे साहित्य बॅगेत भरण्यापूर्वी, तुमच्या एका चोरीमुळे स्वतःच्या हक्काचा घास गमावणाऱ्या त्या निष्पाप, गरीब कामगाराचा चेहरा एकदा नक्की डोळ्यांसमोर आणा!
