नऊ दिवसांत पेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी महाग; आता तेलाच्या डब्यामागे १५० रुपयांपर्यंत वाढ
पिंपरी-चिंचवड :
पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांनी आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता खाद्यतेलाच्या दरांनीही जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या नऊ दिवसांत इंधन दरात तीन टप्प्यांत एकूण पाच रुपयांची वाढ झाली. त्यानंतर वाहतूक खर्च वाढल्याचा थेट परिणाम पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत दिसू लागला आहे. शहरात खाद्यतेलाच्या प्रतिडब्यामागे तब्बल ७० ते १५० रुपयांची वाढ झाल्याने गृहिणी आणि नोकरदार वर्गाचे मासिक बजेट अक्षरशः कोलमडले आहे.
औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच किराणा, भाजीपाला आणि डाळींच्या वाढत्या दरांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यातच आता खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींनी स्वयंपाकघराचे गणित बिघडवले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात तेलाच्या दरात अचानक तेजी आली आहे.
पुरवठ्यावर परिणाम; व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता
बाजारात सध्या मर्यादित प्रमाणातच नवे सौदे होत आहेत. पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. आगामी काळात दर आणखी वाढू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे घाऊक बाजारात खरेदीचा दबाव वाढला असून तेलाच्या किमती दिवसेंदिवस चढत आहेत.
शहरातील किरकोळ बाजारातही याचे परिणाम स्पष्ट दिसू लागले आहेत. सोयाबीन, मोहरी आणि राईस ब्रान तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात किरकोळ बाजारात प्रतिकिलो तीन रुपयांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. पामोलिन आणि तीळ तेलाचे दरही वाढले आहेत.
गृहिणींचे बजेट बिघडले
दरवाढीमुळे सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि नोकरदार कुटुंबांना बसत आहे. आधीच घरभाडे, वीजबिल, शाळांची फी आणि दैनंदिन खर्च वाढलेला असताना आता खाद्यतेल महागल्याने घरखर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. अनेक गृहिणींनी तेलाचा वापर कमी करण्यास सुरुवात केली असून बाजारातील वाढत्या महागाईबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
घाऊक बाजारातील तेलाचे नवे दर (१५ किलो प्रतिडबा)
तेलाचा प्रकार पूर्वीचा दर सध्याचा दर
सोयाबीन तेल
(पूर्वीचा दर)
२५४० ते २५७५
(सध्याचा दर)
२५७५ ते २६२०
मोहरी (सरसो) तेल
(पूर्वीचा दर)
२५५० ते २५७०
(सध्याचा दर)
२८०० ते २९००
राईस ब्रान तेल
(पूर्वीचा दर)
२४५० ते २४८०
(सध्याचा दर)
२५३० ते २५५०
व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाहतूक खर्चातील वाढ कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत खाद्यतेलाचे दर आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
