​धुळीचे लोट अन् बिल्डरांचे धाबे दणाणले! पिंपरी-चिंचवड मनपाचा १७९ विकासकांना ‘दणका

​पिंपरी-चिंचवड ः
पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घालणाऱ्या धुळीच्या साम्राज्याविरोधात महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने आता ‘बुलडोझर’ उपसाला आहे. बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या १७९ बड्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. केवळ नोटीस देऊन न थांबता, सुधारणा न झाल्यास थेट बांधकाम परवाने रद्द करण्याचा कडक इशारा दिल्याने शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही!
​वाकडपासून ते चऱ्होलीपर्यंत शहराच्या कानाकोपऱ्यात सध्या बांधकामांचे पेव फुटले आहे. मात्र, या विकासाच्या नावाखाली हवेत उडणारे धुळीचे लोट नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांच्या फुफ्फुसांत जात आहेत. श्वसनविकाराच्या तक्रारी वाढल्याने जनक्षोभ उसळला होता. याची दखल घेत महापालिकेच्या पथकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले.

​काय आहेत बिल्डरांच्या चुका?
​हिरव्या जाळीचा (Green Net) अभाव: बांधकाम स्थळाभोवती धूळ रोखण्यासाठी आवश्यक पडदे लावलेले नाहीत.
​पाण्याचा फवारा नाही: रस्ते आणि ढिगाऱ्यांवर पाणी न मारल्याने हवेत धूळ साचत आहे.
​अस्ताव्यस्त राडारोडा: सिमेंट कचरा आणि बांधकाम साहित्याची बेजबाबदार वाहतूक.
​बड्या नावांनाही दणका!

या कारवाईच्या कचाट्यातून नामांकित विकासकही सुटलेले नाहीत. दिग्गज कंपन्यांनाही नोटिसा धाडल्या गेल्या आहेत. “विकास हवा, पण तो लोकांच्या जिवावर नको,” असे ठणकावून सांगत महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ज्यांनी सूचनेकडे दुर्लक्ष केले, त्यांना नोटिसा दिल्या आहेत. यापुढेही सुधारणा न झाल्यास बांधकाम परवाने थेट रद्द करण्यात येतील.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिं. चिं. महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *