हिंजवडी आयटी पार्क परिसरात चांगल्या आयटी कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच तरुणांची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ३० मार्च ते १० जून या कालावधीत हिंजवडी फेज २ येथील गेरा इम्पेरिया येथे घडली.
या प्रकरणात दिनेश दत्तात्रयराव भनंग (२८, भुकूम, मुळशी; मूळ- बीड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिन्क्राटेक एक्स कन्सल्टन्सीची संचालक मुस्कान जुनेजा (२२, हिंजवडी, पुणे) हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुस्कान हिने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना दोन महिन्यांत नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. त्यासाठी कमिशन म्हणून प्रत्येक उमेदवाराकडून ५० हजार रुपये लागतील असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. तिने फिर्यादीकडून २ लाख १० हजार रुपये आणि त्यांच्या इतर चार मित्रांकडून ५ लाख ५० हजार रुपये असे एकूण ७ लाख ६० हजार रुपये उकळले. मात्र, पैसे घेऊनही नोकरी न लावता आणि रक्कमेची मागणी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
