चिखलीत गुटखा माफियांवर धडक; ६.२० लाखांचा प्रतिबंधित माल जप्त अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड :
नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घातला आहे. चिखली परिसरात टाकलेल्या धाडीत तब्बल ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी आणि तत्सम अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चिखली परिसरातील एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून त्याची विक्री आणि वितरण सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचत छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला आढळून आला.

या कारवाईत रुस्तम खान, बाबर खान आणि नबी खान यांची नावे समोर आली असून ते प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या व्यवहारात सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच वैभव अर्जुन यादव या घरमालकासह भाडेकरू राजू श्रीवास्तव आणि मनोज चौधरी यांच्याविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या प्राथमिक तपासात हा साठा केवळ स्थानिक विक्रीपुरता मर्यादित नसून त्यामागे मोठे पुरवठा जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रतिबंधित मालाचा पुरवठा नेमका कुठून होत होता, तो शहरात कसा पोहोचवला जात होता आणि त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

यासाठी जप्त मालावरील उत्पादकांची माहिती, पत्ते आणि पुरवठा साखळीचा तपशील संकलित करण्यात आला असून संबंधित उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदारांपर्यंत तपासाची चक्रे फिरविण्यात येणार आहेत. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री, वाहतूक अथवा साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *