क्राईम पेट्रोल पाहून शिकला चैन स्नॅचिंगचा फंडा सराईत चोर अखेर गुन्‍हे शाखेच्‍या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड ः दूरचित्रवाणीवरील ‘क्राईम पेट्रोल’सारख्या गुन्हेगारी मालिका पाहून चैन स्नॅचिंगचे तंत्र शिकलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने थरारक पाठलाग करून गजाआड केले. सुमित गोविंद इंगळे (वय ३१, सध्या रा. मामुर्डी, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
३ जून रोजी पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाईज सोसायटीसमोर एका नागरिकाच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून नेण्यात आली होती. या घटनेनंतर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून आरोपीचा माग काढण्यात आला. बेंगळुरू महामार्गाचा वापर करून तो विविध भागांत गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. तळेगाव दाभाडे, देहूरोड, दापोडी आणि पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातही त्याने अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले.
बाणेर परिसरात दोन दिवस सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाला ७ जून रोजी आरोपी दिसून आला. पोलिसांचा संशय आल्याने त्याने भरधाव वेगाने पळ काढला. मात्र पथकाने त्याचा पाठलाग करत अत्यंत शिताफीने ताबा घेतला.
चौकशीत आरोपीने एकट्यानेच चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सांगवी, दापोडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईमुळे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *