पावणे दोन तासांत रावेतमध्ये १५ लाखांची घरफोडी

​पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी १५ लाख २८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान रावेत गावठाण येथील बबाई बिल्‍डींगमध्‍ये घडली.
मनोज अशोक भोंडवे (वय २५, रा. बबाई बिल्डींग, स्वामी समर्थ सोसायटी जवळ, रावेत गावठाण) यांनी शनिवारी (दि. १६ मे) रोजी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोंडवे यांचे घर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा ते दुपारी साडेबारा असे पावणे दोन तास कुलूप लावून बंद होते. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्‍या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील १७८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड असा एकूण १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचा पुढील तपास रावेत पोलीस ठाण्‍यातील उपनिरीक्षक खिळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *