पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या चुलत भावालाही मारहाण केली. ही घटना पिंपळे निलख येथील डीपी रोडवर शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.
संतोष जनार्दन बालवडकर (वय ४७, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश पाटील (वय २५), अभिषेक भासके (वय १८), जय शिंदे (वय १८, सर्व रा. पिंपळे निलख) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच इतर दोन अल्पवयीन बालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा कार्तिक याने आरोपींकडे पाहिल्याच्या कारणावरून अल्पवयीन बालकाने आणि ऋषिकेश पाटीलने वाद घातला. त्यानंतर जय शिंदे व अभिषेक भासके यांनी तलवारीने आणि रॉडने कार्तिकच्या डोक्यात व कानावर वार केले. भांडण सोडवणाऱ्या अनिश मुरकुटे यालाही उलट्या तलवारीने मारहाण केली. आरोपींनी हवेत हत्यारे फिरवून ‘आम्ही येथील भाई आहोत’ असे म्हणत दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पिंपळे निलखमध्ये टोळक्याकडून तलवारीने प्राणघातक हल्ला
