सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिखलीत पानपट्टी चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न!
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) –
सिगारेटचे पैसे मागितल्याचा क्षुल्लक राग मनात धरून दोन तरुणांनी एका पान टपरी चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, आरोपींनी फेकलेली पेटती माचीसची काडी विझल्याने तरूणाचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना चिखली येथील गणेशनगर, तळवडे भागात सोमवारी (दि. 27 एप्रिल) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली आहे.
सचिन सुनील पुणासे (वय 25, रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. बुराहनपूर, मध्य प्रदेश) आणि भूषण संजय सुरडकर (वय 25, रा. निगोजे, ता. खेड, मूळ रा. बुराहनपूर, मध्य प्रदेश) या दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे (वय 25, रा. गंधर्व एक्सलन्स, मोशी, मूळ रा. वाहाली, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी मंगळवारी (दि 28 एप्रिल) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थरार… नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव तांबारे यांचे गणेशनगर येथे ‘साई रत्न पान शॉप’ आहे. सोमवारी (दि. २७) रात्री १० च्या सुमारास आरोपींनी दुकानातून सिगारेट घेतली. मात्र, वैभव यांनी सिगारेटचे पैसे मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला व त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी आरोपी सचिन पुणासे याने वैभव यांना “जर तू मला सोडले तर मी तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेला.
काही वेळातच आरोपी पुन्हा मोटारसायकल वरून तिथे आले. त्यांच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल होते. आरोपींनी काही कळण्याच्या आत ते पेट्रोल वैभव यांच्या अंगावर फेकले आणि पेटती माचीसची काडी त्यांच्या दिशेने भिरकावली. सुदैवाने, ती काडी हवेतच विझल्याने वैभव यांचा जीव वाचला व तो तेथून पळून गेला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून त्यांना जेरबंद केले.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवकर करत आहेत.
