लखनऊ : अयोध्येतील राम मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनात कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास इलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणात कोणतीही घाई करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती पंकज भाटिया आणि न्यायमूर्ती अमिताभ कुमार राय यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने सध्या अनेक प्रकरणांवर सुनावणी सुरू असल्याचे नमूद करत या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असल्याने सध्याच्या टप्प्यावर तातडीच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने तोंडी निरीक्षण नोंदवले. त्यामुळे या प्रकरणावरील पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
