हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या मल्लांना चितपट करत ६२ किलो गटात सुवर्णपदक; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
पिंपरी-चिंचवड –
देशातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या पैलवान प्रगती गायकवाड हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये १४ ते १७ मे २०२६ दरम्यान झालेल्या चौथ्या सीनियर महिला हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत प्रगतीने ६२ किलो वजन गटात अव्वल येत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.
राजेश्वर प्रतिष्ठान, भारतीय शैली कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य भारतीय कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली. देशभरातील हजारो पुरुष आणि महिला मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये प्रगती गायकवाड हिने हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या कुस्तीतील बलाढ्य राज्यांतील महिला पैलवानांना धूळ चारत अंतिम फेरीत सुवर्णपदकावर नाव कोरले.
विशेष म्हणजे, महिला कुस्ती गटातून महाराष्ट्राला मिळालेले हे एकमेव सुवर्णपदक ठरले. त्यामुळे प्रगती गायकवाडच्या यशामुळे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रगतीच्या या यशाबद्दल शहरातील क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर प्रगतीने हे यश मिळवत युवा खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
