वाल्हेकरवाडीत एफडीएचा मोठा छापा; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त दोन वाहनांसह मोबाईल ताब्यात; संघटित रॅकेटवर ‘मकोका’ची टांगती तलवार, तस्करांमध्ये खळबळ

पिंपरी-चिंचवड ः
राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी धडक कारवाई केली. वाल्हेकरवाडी परिसरात टाकलेल्या छाप्यात २१ लाख ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील गुटखा तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसला असून संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या पुणे विभागीय पथकाने वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौक परिसरात सापळा रचला. १९ जून रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. हा माल विक्रीसाठी तसेच शहरात विविध भागांत पुरवठा करण्यासाठी साठवून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या कारवाईत १२ लाख ३५ हजार ५२० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच प्रतिबंधित मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहने आणि मोबाईल फोनही प्रशासनाने ताब्यात घेतले. जप्त वाहनांची व मोबाईलची किंमत ८ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे. अशाप्रकारे एकूण २१ लाख ११ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी असताना काही तस्करांकडून चोरीछुप्या मार्गाने हा व्यवसाय सुरू असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एफडीएने कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत.

सदर प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे रॅकेट संघटित स्वरूपात कार्यरत असल्याची शक्यता तपासली जात आहे. त्यामुळे आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागाकडून एफडीएकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील कारवाईनंतर त्याच दिवशी एफडीएच्या पथकाने इंदापूर येथेही धडक कारवाई केली. एका दुकानात छापा टाकून २ लाख ४१ हजार १४० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. संबंधित दुकान तत्काळ सील करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या सलग कारवायांमुळे प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या साखळीवर आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अशा व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *