पुणे:
वारकऱ्यांसाठी आणि पुणे परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आळंदी येथे अत्याधुनिक ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काही वर्षांत या परिसराचा मोठा कायापालट होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर वाढत असलेला ताण आणि मर्यादित क्षमता लक्षात घेऊन संपूर्ण परिसराचा व्यापक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या नियोजनाअंतर्गत पुढील तीन वर्षांत मोठे बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पूर्वी उरुळी येथे ‘मेगा टर्मिनल’ उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, तेथे जमीन संपादनासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने हा प्रकल्प पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील रेल्वेची उपलब्ध जागा निवडण्यात आली असून, तेथेच आता आधुनिक ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ उभारले जाणार आहे.
या प्रकल्पात नऊ फलाट, सात गाड्या देखभाल खड्डे आणि सतरा गाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहेत. या ठिकाणी गाड्यांची स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापनाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी आणि ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पुणे विभागाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
आळंदीतील या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाला येण्या-जाण्याची अधिक सुलभ व्यवस्था मिळणार असून, परिसराच्या विकासालाही मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
