नवी दिल्ली(delhi): पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षात मोठी अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. पक्षात सुरू असलेल्या या राजकीय हालचालींमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील 60 हून अधिक आमदारांनंतर आता सुमारे 20 खासदारांनीही बंडाचा पवित्रा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या बंडखोर खासदारांमध्ये टीएमसीचा तरुण चेहरा आणि माजी अभिनेत्री सायनी घोष यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे.
सायनी घोष यांचा प्रवास
सायनी घोष यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1993 रोजी झाला. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी बंगाली मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. 2010 मध्ये ‘इच्छे दाना’ या टेलिफिल्ममधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ‘नोटोबोर नोटआउट’ या चित्रपटामुळे त्या मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध झाल्या. ‘शोत्रू’, ‘कानमाची’, ‘अंतराळ’, ‘एकला चलो’, ‘राजकाहिनी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय बंगाली चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी कोलकाता फुटबॉल लीगच्या थेट प्रक्षेपणातही सूत्रसंचालन केले आहे.
राजकीय प्रवेश आणि झपाट्याने वाढलेले स्थान
2021 मध्ये सायनी घोष यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजकारणात पाऊल ठेवले. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांना आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत 2023 मध्ये त्यांची टीएमसी युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जादवपूर मतदारसंघातून विजय मिळवत संसदेत प्रवेश केला आणि अवघ्या 31 व्या वर्षी त्या खासदार बनल्या.
बंडामागील कारणांवर चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक काळात विरोधकांनी सायनी घोष यांच्यावर तीव्र टीका केली असताना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, अशी त्यांची तक्रार होती. पक्षातील निर्णयप्रक्रिया आणि अंतर्गत समन्वयाबाबतही त्यांचा असंतोष वाढत गेला असल्याचे सांगितले जाते.
याच पार्श्वभूमीवर त्या इतर नाराज खासदारांसोबत बंडाच्या भूमिकेत गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या घडामोडींवर टीएमसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राजकीय वर्तुळात खळबळ
टीएमसीतील मोठ्या प्रमाणावरील असंतोष आणि संभाव्य बंडामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी ही गंभीर आव्हानात्मक परिस्थिती मानली जात आहे. आगामी काळात या बंडाची दिशा काय राहील आणि पक्षात तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
