Pimpri-Chinchwad-पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खांदेपालट! ८ अधिकाऱ्यांची पदोन्नतीनंतर बदली; तीन नवे एसीपी शहरात दाखल

पिंपरी-चिंचवड ः
राज्य सरकारच्या पदोन्नती आदेशानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे प्रशासकीय फेरबदल झाले आहेत. शहरातील आठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) तथा पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची राज्यातील विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तीन नव्या अधिकाऱ्यांची शहरात नियुक्ती झाल्याने पोलीस प्रशासनात नवे बदल पाहायला मिळणार आहेत.

पुणे शहरातून सुनिल पांडूरंग पंधरकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप वसंत कसबे यांनाही पदोन्नतीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच दिपक रामदास साळुंखे यांचीदेखील सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांमुळे शहराच्या पोलीस प्रशासनाला बळ मिळणार आहे.

दरम्यान, पदोन्नती मिळालेल्या पिंपरी-चिंचवडमधील आठ अधिकाऱ्यांची राज्यातील विविध जिल्ह्यांत नियुक्ती करण्यात आली आहे. सुदाम भिकाजी पाचोरकर यांची सातारा जिल्ह्यातील पाटण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नितीन मधुकर गिते यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अंकुश पांडूरंग बांगर यांची महाराष्ट्र राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, मुंबई येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच वर्षाराणी जीवनधर पाटील यांची पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेत, अनिल कोंडीबा विभूते यांची परभणी जिल्ह्यातील जिंतूर उपविभागात, प्रमोद सदाशिव वाघ यांची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक नारायण कडलग यांची नंदुरबार पोलीस मुख्यालयात, तर महेश हंबीरराव पाटील यांची भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

या पदोन्नती आणि बदल्यांमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या कायदा व सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण आणि प्रशासकीय कामकाजात नव्या नेतृत्वाची छाप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *