पुणे, दि. २९ : पुणे–सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले असून, ८ जुलै २०२७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा बदल लागू राहणार आहे.
आदेशानुसार, थेऊर फाटा ते लोणीकंद या मार्गावरील सर्व अवजड वाहतूक केडगाव चौफुला–न्हावरे–तळगाव ढमढेरे–शिरूर या पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुरुस्तीच्या कालावधीत संबंधित मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अपघाताचा धोका कमी करण्यासाठी वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
वाहतूक शाखा आणि संबंधित यंत्रणांकडून पर्यायी मार्गावर आवश्यक नियोजन करण्यात येणार असून, वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
