तीन लाखांची खंडणी स्वीकारणारा ‘मसना’ जेरबंद गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांचा फिल्मी स्टाईल ट्रॅप!

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – “चाकण भागात माझी मोठी दहशत आहे. इथे सिक्युरिटीचा व्यवसाय चालवायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुला खल्लास करून टाकेन,” अशी धमकी देऊन तीन लाखांची खंडणी स्वीकारणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीकांत शामराव बाबर (वय ४४, रा. नवी सांगवी) यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार बाबर आणि त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर संदीप कणसे यांना आरोपी महेश शिरोळे हा २५ जून ते २९ जून दरम्यान मोबाइलवरून सतत धमक्या देत होता. सुरुवातीला त्याने १० लाख, नंतर क्रमशः ८ लाख, ७ लाख आणि शेवटी ६ लाख रुपयांची खंडणी मागितली. धमकीला घाबरून बाबर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. ३० जून रोजी ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक अनोखा ‘फिल्मी’ प्लॅन आखला. पोलिसांनी ५०० रुपयांच्या १२ खऱ्या नोटा आणि ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ लिहिलेल्या हुबेहूब दिसणाऱ्या ५८८ डमी नोटा वापरल्या. १०० नोटांच्या ६ बंडलांमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा लावून हुबेहूब ३ लाख रुपयांचे बंडल तयार केले आणि ते प्लास्टिक पिशवीत ठेवून सुपरवायझरकडे दिले.
​ठरल्याप्रमाणे दिघी येथील आळंदी-पुणे रोडवरील मॅक्झिन चौकातील स्वच्छतागृहाजवळ आरोपी पैसे घेण्यासाठी आला. सुपरवायझरकडून तीन लाख रुपयांची ती पिशवी स्वीकारत असतानाच, दबा धरून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने झडप घालून ‘मसना’ला रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *