मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसानंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांवरील ताण यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, “आज मुंबईत मान्सून पावसाला सुरुवात झाली आणि महापौरांसमोरच मुंबईकरांची व्यवस्था-अवस्था खड्यात गेली आहे हे सिद्ध झाले. पावसाळ्यापूर्वी महापौर आणि अमित साटम नालेसफाई व रस्ते दुरुस्तीच्या कामांची टक्केवारी सांगत होते. मात्र पहिल्याच पावसाने त्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.”
त्यांनी पुढे आरोप केला की, मुंबईतील परिस्थिती पाहता महापौर आणि सत्ताधारी मुंबईकरांच्या जीवाचा तसेच सत्तेचा जुगार खेळत असल्याचे वाटते. “या सर्व परिस्थितीत नेहमीप्रमाणे मुंबईकरच भरडला जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या असून महापालिका प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
शालिनी ठाकरे यांच्या या टीकेनंतर मुंबईतील मान्सूनपूर्व तयारी, नालेसफाई आणि पायाभूत सुविधांच्या कामांवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
