पिंपरी-चिंचवडमध्ये १४ दिवस कडक निर्बंध; जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; विनापरवानगी सभा, मिरवणुका आणि शस्त्र बाळगण्यावर बंदी

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढील १४ दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विनापरवानगी सभा, मोर्चे आणि मिरवणुका काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस सह आयुक्त सारंग आवाड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हे आदेश लागू केले आहेत. हे आदेश २४ जूनपासून ७ जुलैपर्यंत प्रभावी राहणार आहेत. शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आदेशानुसार तलवार, भाला, काठी, सोटा, बंदूक, दगड किंवा इजा पोहोचवू शकणारी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई असेल. तसेच स्फोटक किंवा दाहक पदार्थ सोबत ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक प्रेत, चित्र किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करून त्याचे दहन करण्यासही परवानगी असणार नाही.

याशिवाय आक्षेपार्ह घोषणा, चिथावणीखोर भाषणे, समाजात तेढ निर्माण करणारे साहित्य प्रसारित करणे, मोठ्या आवाजात घोषणाबाजी करणे किंवा वाद्य वाजवणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल, अशी कोणतीही कृती सहन केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, सरकारी कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी आणि कायदेशीर परवानगी असलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मात्र आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून संबंधितांविरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
आगामी काळात विविध सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *