मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन परीक्षा पद्धत मनमानीपणे लागू केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन पुढील ८ ते १० दिवसांत निर्णय न झाल्यास स्वतः विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
रोहित पवार यांनी आरोप केला की, राज्यसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा पद्धत लागू करताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मत विचारात घेतले नाही. विद्यार्थ्यांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आल्याने त्यांच्या मनात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
सरकार आणि आयोगाने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा लढा यशस्वी झाला. आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांकडूनही MPSCच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीबाबत फेरविचार करण्याची मागणी होत आहे. सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.
