पुणे :
ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक तसेच अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडितांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या घटकांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नियुक्त नोडल अधिकारी संबंधित नागरिकांच्या तक्रारी तत्काळ स्वीकारून त्यावर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करतील. तसेच तक्रारदारांशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने वागणूक दिली जाईल, याचीही जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी समाज आणि अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडितांना न्याय मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी संबंधित नागरिकांना केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संवेदनशील घटकांना अधिक सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि जलद न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
