“निवडणुकीपुरते नव्हे, पुढील चार वर्षे जनतेसाठी रस्त्यावर”

पिंपरी-चिंचवडमध्ये अमित ठाकरेंची कार्यकर्त्यांशी थेट चर्चा; मराठी मुद्द्यावर सरकारला घेरले

पिंपरी-चिंचवड – निवडणुकांच्या चौकटीबाहेर जाऊन काम करण्याचा निर्धार मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. “पुढील चार वर्षे आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी मैदानात असू,” असा स्पष्ट संदेश त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना दिला. ‘संपर्क अभियान’ अंतर्गत झालेल्या या बैठकीत त्यांनी एक-एक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्षबांधणीवर भर दिला.
बैठकीत अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर उपस्थित होते. अमित ठाकरे यांनी राज्य सरकारच्या योजनांवर टीका केली. “निवडणुकीच्या तोंडावर योजना आणून मतांसाठी आमिष दाखवले जाते,” असा आरोप त्यांनी केला. ‘लाडकी बहीण’ योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ड्रग्जच्या वाढत्या समस्येवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “ड्रग्जचे जाळे शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचले आहे. सरकार याकडे दुर्लक्ष का करते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलीसांना मोकळे हात दिल्यास परिस्थिती बदलू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
मराठी भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. मराठी माणसाच्या सन्मानावर कुणी गदा आणू नये, असा इशारा देताना गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यांवरही त्यांनी टीका केली.
दिवसभर चाललेल्या बैठकीत प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. तळागाळात पक्ष मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “जनतेशी थेट संपर्क वाढवून मनसेची पकड अधिक बळकट करू,” असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *