मोशीतील अल्पवयीन मुलींवरील अतिप्रसंगाच्या प्रयत्नानंतर एटीसीची धडक कारवाई; सुरक्षा एजन्सींच्या बेफिकिरीचा पर्दाफाश
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – मोशी परिसरातील एका सोसायटीत अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने (एटीसी) मोठी कारवाई केली आहे. संबंधित सुरक्षा रक्षकाचे पोलीस व्हेरिफिकेशन न करताच त्याला कामावर ठेवणाऱ्या सुरक्षा एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील सुरक्षा एजन्सींच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजाभाऊ नारायण मुर्गीरकर (वय ४०, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या एजन्सी मालकाचे नाव आहे. त्यांची ‘एस. के. सिक्युरिटी’ नावाची सुरक्षा रक्षक एजन्सी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश बाबूराम चौधरी (वय २४, रा. मोशी, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला संबंधित एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. मात्र त्याची कोणतीही पोलीस पडताळणी करण्यात आली नव्हती.
धक्कादायक बाब म्हणजे कामावरील पहिल्याच दिवशी दिनेश याने ज्या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, त्याच सोसायटीतील पाच ते दहा वर्ष वयोगटातील चार अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पिंपरी-चिंचवड एटीसीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. सुरक्षा एजन्सीमार्फत काम करणाऱ्या इतर सुरक्षा रक्षकांचीही पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान एजन्सी मालक राजाभाऊ मुर्गीरकर यांनी कोणत्याही सुरक्षा रक्षकाचे पोलीस व्हेरिफिकेशन केले नसल्याचे उघड झाले.
यानंतर एटीसीने एजन्सी मालकाविरोधात बीएनएस कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील खासगी सुरक्षा एजन्सींमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, “सुरक्षा रक्षकांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा तपास यंत्रणांकडून देण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षकाची पडताळणीच नाही; एजन्सी मालकावर गुन्हा
