पशुसंवर्धन विभागाचे सूक्ष्म नियोजन; पारदर्शक अंमलबजावणीवर भर
पुणे, दि. २२ : पशुसंवर्धन आयुक्तालय तर्फे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक काम पूर्ण होताच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे, पशुपालन व्यवसायाला आधुनिक उद्योजकतेचे स्वरूप देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील युवक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये या योजनेबाबत मोठा उत्साह दिसून येत असून, योजनेची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.
लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी महाआयटी कडून विशेष पोर्टल विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोर्टलचे काम पूर्ण होताच योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.
योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती, मार्गदर्शन अथवा शंकानिरसनासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी टोल-फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधावा, तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
