झोमॅटोवरून केक ऑर्डर करणे पडले महागात; हिंजवडीत महिलेची सव्वा लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पतीच्या वाढदिवसासाठी मागवलेला केक वेळेत न आल्याने कस्टमर केअरला फोन लावलेल्या महिलेला सायबर चोरट्यांनी एक लाख ३१ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हिंजवडी फेज ३ मधील सांग्रिया मेगा पॉलीस सोसायटीत ३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी मोबाइल क्रमांक ९३३०२९७८११ वापरणाऱ्या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिला फिर्यादीने याप्रकरणी मंगळवारी (दि. ५ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी पतीचा वाढदिवस असल्याने फिर्यादी महिलेने झोमॅटोवरून केक ऑर्डर केला. मात्र केक वेळेत न आल्याने फिर्यादीने गुगलवरून मिळालेल्या नंबरवर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने ‘पैसे रिफंड करतो’ असे सांगून महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज पाठवला. त्यानंतर फिर्यादीच्या ॲक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून एक लाख ३१ हजार रुपये परस्पर काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.